श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी रात्री ठिकठिकाणी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. पारगाव, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, पिंप्री कोलंदर परिसराला अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला आहे. तोडणीला आलेला ऊस आडावा झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सुमारे साडे तीन हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. शेतकऱ्यांनी मेहनत करून द्राक्ष शेतीत फुलोरा निर्माण केला होता. मात्र फुलोऱ्यावर अवकाळी गारा पडल्याने फूल, फळांना काळी बुरशी लागली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फूल-फळ गळून पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांनी यंदा घट होणार आहे. द्राक्षबागांचे हब असलेल्या पारगाव सुद्रिकमध्ये द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावची बाजारपेठ आणि व्यवहार आडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे. तोडणीला आलेला ऊस वादळामुळे सपाट झाला असून, चारा पिकेही भुईसपाट झाली आहेत.
औषधांसाठी रांगा
अवकाळी पावसाने पिके शेवटचा श्वास घेऊ लागली आहेत. शेतकरी सैरभैर झाले असून, पीक जगविण्यासाठी कृषी केंद्रावर औषधे खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कृषी केंद्र चालकांची उलाढाल वाढली आहे तर शेतकऱ्यांचा खिसा रिकामा होत आहे.
पारगाव सुद्रिकची अर्थव्यवस्था ही दाक्ष बागांवर अवलंबून आहे. अवकाळीने ५० टक्के द्राक्ष बागा निकामी केल्या आहेत. त्यामुळे पारगावचा शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. त्यांचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी दोन लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी. – भाऊसाहेब खेतमाळीस, दाक्ष उत्पादक शेतकरी, पारगाव सुद्रिक
पारगाव सुदिक, पिनी कोलंदर परिसरात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. शासनाचे काय आदेश येतात, त्यानुसार पंचनामे करण्यात येतील. -दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा.