भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरुच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अति महत्त्वाचे धरण समजले जाते. या धरणावर उत्तर नगर जिल्हा सुजलम झाला असल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे धरणाच्या पाणलोटात होत असलेल्या पावसावर लक्ष असते भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गुरुवारी संध्याकाळपासुन पावसाचे पुनरागमन झाल्याने धरणाच्या पाण्यात लक्षणीय वाढ होत आहे.
भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा साडेपाच हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे गेला आहे, शनिवारी व रविवारी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह भंडारदरा परिसरातही पाऊस सुरूच होता.
रतनवाडी, साम्रद, घाटघर या भागामध्ये पाऊस कोसळतच असुन पावसामध्ये गारवा असल्याने आदिवासी बांधवांच्या शेकोट्या पेटल्या गेले आहेत, हवेत प्रचंड गारवा असल्याने आदिवासी बांधवांनी आपली जनावरे घरातच बांधुन ठेवणे पसंद केले.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसात भिजण्याचा शनिवारी पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती.
या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी दत्तात्रय पडवळे व परिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांचे कर्मचारी कर्मचारी तसेच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे, अशोक काळे, दिलीप डगळे व इतर कर्मचारी यांनी चौख बंदोबस्त बजावला.
गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून रतनवाडी येथे ६५ मिलिमीटर, घाटघर ७० मिलिमीटर तर पांजरे ६३ मिलिमीटर पाऊस पडला असल्याची माहिती समोर आली आहे.
कळसुबाई शिखरावर कोसळत असलेल्या पावसामुळे कृष्णावंती नदी वाकी धरणावरून १९७ क्युसेकने वाहत असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा १६९१ दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरण ५० टक्के भरले आहे.