अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस ! शेतकरी सुखावला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दहा दिवस अक्षरशः कोरडे गेले. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. गणेशोत्सवात बाप्पा पावेल, पाऊस भरपूर पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

हवामान खात्यानेही दमदार पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज तूर्त तरी खरा ठरला असून, गणेशोत्सवात पावसास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेले पाऊस फक्त दिलासाच देणारा आहे. जिल्ह्यातील दुष्काळ हटण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची खरी गरज आहे. अद्यापही लहान-मोठी धरणे, पाझर तलावे, बंधारे कोरडीठाकच आहेत. विहिरींनीही तळ गाठलेलाच आहे म्हणूनच जिल्ह्यासह राज्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शुक्रवारी (दि.२२) दमदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने प्रचंड उघडिप दिली होती.

बऱ्याच कालावधीनंतर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात पाऊस पडल्याने गणपती बाप्पा पावला, अशीच सकारात्मक प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे. हा पाऊस शेतातील पिकांसाठी संजीवनी ठरला आहे. मात्र, आणखी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे.

गुरुवारी श्रीगोंद्यासह काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. श्रीगोंद्याच्या काही पट्ट्यात धो-धो पाऊस झाला. जोरदार पावसामुळे श्रीगोंद्यातील काही नद्यांना पूर आला. गुरुवारनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली.

नगर शहरात शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास पावसाची जोरदार सरी पडल्या. शहरासह उपनगरातही दमदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप चालूच होती. दुपारनंतरही बऱ्यापैकी पाऊस झाला.

पावसामुळे नगर शहरातील सखल भागात पाणी पाणी साचले होते. रस्त्यावरील खड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होते. दिवसभर पाऊस पडत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे नगरकरांची मोठी गैरसोय झाली.

ग्रामीण भागात पावसाने दमदार पद्धतीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office