पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध दर असणाऱ्या घाटघर येथे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळल्याने १४ इंच पावसाची नोंद झाली असून भंडारदरा धरण गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता ७६ टक्के भरले आहे. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र पावसाचे माहेरघर म्हणून समजले जाते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी मात्र या परिसरात पावसाने कहरच केला. या भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. वाड्या वस्त्यांना जाणाऱ्या रस्त्यावर ओढे-नाले प्रचंड प्रमाणात वाहत असल्याने अनेकांना रस्त्यावरच थांबावे लागले होते.
पांजरे येथील ग्रामपंचायत ऑफिसजवळ असलेल्या ओढ्याला प्रचंड पूर आल्याचे दिसून आले. बुधवारी पडलेल्या पावसामुळे मात्र आदिवासी बांधवांची भात शेती पाण्याखाली गेलेली दिसून आली. तर अनेक शेतकऱ्यांच्या बांध फुटल्याचेही समजत आहे. बुधवारी संध्याकाळनंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याचे दिसून आले.
गुरुवारी दुपारनंतर भंडारदऱ्यासह पाणलोटातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. २००४ सालीसुद्धा अशाच पद्धतीने पाऊस कोसळत होता. तेव्हासुद्धा धरणाचा पाणीसाठा तीनच दिवसांमध्ये पूर्ण झाला होता. आतासुद्धा दोनच दिवसांमध्ये भंडारदरा धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. २००४ सालाची पुन्हा पुनरावृत्ती होणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घाटघर हे अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असून हे गाव अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजले जाते. बुधवारी घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे, कोलटेंभे, मुतखेल या परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. या प्रचंड कोसळत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांचे भातशेती वाहून गेली. घाटघर येथे १४ इंच पावसाची नोंद झाली असून रतनवाडी येथे १३ इंच पाऊस कोसळला आहे.
आत्तापर्यंत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात हा पावसाचा यावर्षीचा विक्रम आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये २४ तासात १२३५ विक्रमी पाण्याची आवक झाली असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८४६० दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा धरण ७६.६४ टक्के भरले आहे.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावरही बुधवारी पावसाने आभाळमाया केली. प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळे वाकी धरणावरून २२०० क्युसेकने पाणी गुरुवारी सकाळी कृष्णावंती नदीमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा ३१९२ दलघफु झाला आहे.