यंदा प्रचंड पाऊस; पण बळीराजाची झोळी खालीच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्या आजच्या पिढीने कधीच पाहिला नाही असा पाऊस यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून होतोय. सुरुवातीला तो चांगला वाटला. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या. कुणालाच वाटलं नाही आज चांगला वाटणारा पाऊस पुढे नकोसा होईल.

नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यातील खरीपासह इतरही पिकांचे 70 टक्क्याहून अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारी आदेश नसल्याने या नुकसानीचे पंचनामे अद्यापही करण्यात आले नाहीत. शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीची दखल ना कृषी विभागाने घेतली, ना महसूल विभागाने. शेतक-यांचे कोट्यावधी रूपयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे.

त्यामुळे शेतक-यांमधून चिड व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग घास या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाउसाने डाळिंब फळाचेही नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते बळीराजासाठी काही नवीन नाही. पाऊस जास्त पडला तरी नुकसान आणि कमी पडला तरी नुकसान ही चक्र बळीराजाच्या आयुष्यातून कधीच जात नाही.

शेतक-यांना आता किमान पुढील पिकांसाठी शेतजमीन तयार करायची आहे. तत्पुर्वी पंचनामे होणे गरजेचे होते. मात्र सरकारी पातळीवर आदेश नसल्याने पंचनामे होत नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. आम्हाला आदेश आले तर आम्ही पंचनामे तात्काळ सुरू करू असेही त्यांनी सांगितले. यंदा वारेमाप पाऊस झाला मात्र शेतक-यांच्या हाती काहीच लागले नाही.

गेली सहा महिने लॉकडाऊनमुळे भाजीपाला व फळे बाजारात विकता आली नाहीत व आता पाऊस झाल्याने पिके वाया गेली. खरीपाचे काही ठिकाणी पंचनामेही झाले होते, मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच कार्यवाही सरकारी पातळीवर झाली नाही. आता तर पंचनामेच नाहीत, त्यामुळे शेतकरी वा-यावर सोडले आहेत. अशी प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करत आहेत. एक तर शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही.

त्यातही पावसाने नुकसान झाले आहे. त्याचीही कोणीच दखल घेत नाही, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. तालुक्यातील पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र कृषी अधिकारी आदेशाची वाट पाहत आहेत. तालुक्यात अंदाजे किती नुकसान झाले हेही सांगता येत नाही. त्यांना कोणत्या भागात कोणत्या पिकांचे नुकसान झाले हे माहित नाही. तहसीलदारांचा आदेश नाही, त्यामुळे आम्ही पंचनामे केले नाहीत आदेश आल्यावर पंचनामे करू असे त्यांनी सांगीतले. किमान कृषी अधिकारी शेतक-यांच्या भेटीला गेले असते तरीही शेतक-यांचे समाधान झाले असते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24