अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : गुरुवारपर्यंत अतिवृष्टी ! पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:जिल्ह्यात आजपर्यंत ३०६.० मि.मी. (६८.३ %) पर्जन्यमान झालेले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संततधार पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून १६,७८८ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५,८२२ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,१२० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८३० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिले आहेत.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो.

धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही निचित यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office