पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून जोरदार वारा व ढगांच्या गडगडाटासह तुफान पर्जन्यवृष्टी पाऊस हवेतील उष्णता कमी होवून गारवा निर्माण झाल्याने शेतकरी सुखावले, पण जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या, चिकूच्या झाडांवरील चिकू मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अचानकपणे आलेल्या पावसाने शेतातील उन्हाळी कांदे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत टाकले आहेत. पण थोड्या फार प्रमाणात शेतकऱ्यांचे कांदे शेतात उघड्यावर असल्याने ते झाकण्यासाठी प्लास्टिक कागद, ताडपत्री घेवून झाकण्यासाठी धांदल उडाली होती.
शेतकऱ्यांची शेतातील उन्हाळी पिके काढून झाल्यानंतर शेती उन्हात मशागतीसाठी गरम झाल्याने पुढील पावसाळी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरते, म्हणून शेती नांगरटीची कामे युद्ध पातळीवर सुरू होते. पण अचानक आलेल्या पावसाने या नांगरटीच्या कामांना अचानक थांबवावे लागले. पण या पावसाने जीवाची होणारी लाही लाही व येणाऱ्या घामांच्या धारा थांबल्याने हवेतही गारवा निर्माण झाला आहे.