अहमदनगर बातम्या

मुसळधार पावसाने भंडारदरा परिसर झोडपला, धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ !

Published by
Ahmednagarlive24 Office

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी सुरूच आहे. मुसळधार पावसाने भंडारदरा धरणाचा परिसर झोडपून काढला असून पावसाचे तांडव सुरू असल्याने भंडारदरा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ तासामध्ये भंडारदरा धरणात अर्ध्या टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची आवक झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. प्रचंड वारा आणि पाऊस यामुळे भंडारदरा धरणाच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घाटघर, रतनवाडी, साम्रद या धरणाच्या पाणलोट परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे उडदावणे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे दिसून आले आहे. प्रचंड होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत असून गत २४ तासात ५१५ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाल्याचे दिसुन आले.

प्रचंड होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वी भरण्याचे संकेत आत्ताच दिसू लागले आहेत. भंडारदरा धरणाची क्षमता ११०३९ दशलक्ष घनफूट असुन मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणामध्ये ६५११ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले होते. भंडारदरा धरण ५९% भरले आहे.

हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाचे सातत्य टिकून असल्याने मुळा नदी दुथडी भरुन वाहत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे १३३ मिलिमीटर, रतनवाडी १३० तर पांढरे येथे ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कळसुबाईच्या शिखरावरही प्रचंड पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंतीला पूर आला आहे. त्यामुळे वाकी धरणावरूनही ५५६ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत असल्याने निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत आहे.

Ahmednagarlive24 Office