फिल्टरच्या अशुद्ध पाण्याची तालुक्यात जोरदार विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शासकीय कार्यालयांपासून ते कोणत्याही सार्वजनिक वा घरगुती कार्यक्रमांत स्वस्त आणि गारेगार फिल्टरच्या पाण्याच्या जारची जोरदार विक्री होत आहे.

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अशा फिल्टरच्या पाण्याची जोरदार विक्री सुरू असून, शहरात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत.

अशा परिस्थितीतही पाण्याच्या या व्यवसायाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनासह आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन जारमधील पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

शहरासह तालुक्याच्या विविध भागात फिल्टर पाण्याच्या व्यावसायिकांनी थंड पाण्याचे दुकाने थाटली असून, अवघ्या २० ते ३० रुपयांत २० लिटर पाण्याचा जार घरपोच दिला जात आहे, पण यातील पाणी कोठे भरले जाते, ते कसे भरले जाते. त्याची गुणवत्ता काय? हे पाणी शुद्ध की, अशुद्ध ठरवण्याची कोणतीच यंत्रणा सध्या प्रशासनाकडे नाही.

कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.

गल्लोगल्लीच्या या दुकानांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा.

पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच होते. नंतर या व्यवसायाने विशाल रुप धारण केले आहे.

भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्लीबोळामध्ये असे व्यवसाय सुरु झाले आहे. मात्र, यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

तसेच त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही. हा व्यवसाय करत असताना खबरदारीचा कोणत्याही उपाययोजना व्यावसायिकांनी केलेल्या दिसून येत नाही.

ग्रामीण भागासह शहरातील घराघरांत पिण्याचे पाणी म्हणून वापरण्यात येणारे प्लास्टिकच्या पारदर्शक जारमधील पाणी म्हणजे शुद्ध फिल्टरचे पाणी, असे मानले जाते.

मात्र, हे पाणी शुद्ध की, अशुद्ध हे तपासण्यासाठी सध्या सरकारकडे कोणतीच यंत्रणा नाही.