अहमदनगर बातम्या

कटरने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून, अहमदनगरमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वापरण्यास दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने कटरने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरात हा थरार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड (रा. गोंधवणी, वॉर्ड नंबर १) याने आपल्या ओळखीच्या असलेल्या आकाश बबन ढमके (रा. गोंधवणी) याला आपला होम थिएटर व स्पीकर वापरण्यास दिला होता.

आकाश हा नेहमी घरी येत असल्याने त्याने होम थिएटर पाहिल्याने रमेशने त्याला तो दिला होता. बऱ्याच दिवसांनंतर आकाश हा दिसल्यानंतर रमेशने आपला होम थिएटर आणि स्पीकर त्याला मागितला. तेव्हा आकाशने त्या स्पीकरबाबत मला काही विचारायचे नाही, माझ्या नादी लागायचे नाही, असे म्हणत धमकी दिली व त्याच्याजवळील कटरने त्याने रमेश याच्यावर वार केला. तसेच डोक्यात लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला.

रमेश याचा चुलतभाऊ शेखर राजू गायकवाड हा त्यावेळी जवळच असल्याने तो धावत गेला आणि त्याला आपला जखमी चुलतभाऊ रमेश यास पहिले. त्यानंतर त्याला साखर कामगार रुग्णालय आणि नंतर लोणी येथे उपचारासाठी नेले. लोणी येथे जखमीवर उपचार सुरू असताना काल शनिवारी (दि. २२) जखमी रमेश गायकवाड याचा मृत्यू झाला.

त्यामुळे शेखर गायकवाड याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश बबन ढमके उर्फ डंग्या याच्या विरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंखे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office