अहमदनगर बातम्या

हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ मात्र हिंदूंना ‘ते’ शिक्षण देणे काळाची गरज : कालीचरण महाराज

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :

धर्म हे देवाला आपले करण्याचे साधन असून धर्मासाठी प्रत्येक हिंदुने आज एकत्र येण्याची गरज आहे. हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे, कारण आपली संस्कृती, परंपरा, आचरण माणसाला माणसासारखे जगायला शिकवते .

त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हिंदु धर्माचा अभिमान बाळगून आपला धर्म पुढच्या पिढ्यांमध्ये रुजविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. तसेच रामराज्यात खऱ्या अर्थाने जनता सुखी होती. आता पुन्हा रामराज्य आणण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत. त्या राजकारण्यांमागे खंबीरपणे उभे रहा. असे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले.

महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशामध्ये हिंदु समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील श्रीराम मंदिर चौकात वारकरी सांप्रदाय, हिंदु रक्षा कृती समितीच्यावतीने बुधवारी धर्मसभेचे आयोजन केले होते.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड ते श्रीराम मंदिर चौक, असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी हजारोच्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होता.

याप्रसंगी कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, हिंदूमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे त्यांना धर्माबद्दल फारसे माहित नाही, सध्याच्या काळात त्यांना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे.

तुमच्या पुढच्या पिढीला धर्माबद्दल सांगितले नाही तर विनाश नक्की आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण करा, असे आवाहन त्यांनी केले. नवनाथ महाराज म्हस्के म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला होता.

विषमता संपविण्यासाठी या कायद्याची गरज आहे. भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले, हिंदु समाज समृद्ध करणारी व्यवस्था आहे. म्हणून आपल्या युवकांना जाणिवपूर्वक राष्ट्रवाद समजून सांगितला पाहिजे. या धर्मसभेला हजारोंच्या संख्येने हिंदुबांधव उपस्थित होते.

दरम्यान धर्मसभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तासाठी ४५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यात ५० अधिकारी व स्थानिक पोलीस, उत्तर नगरमधील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस बळ, जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस असे एकूण ४०० कर्मचारी शहरात तैनात होते.

Ahmednagarlive24 Office