राहते घर आपल्या नावे करण्याची धमकी देत मुलगा व सुनेने एका वृद्ध महिलेला मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सतीश रामदास कदम (वय ५८) आणि अलका सतीश कदम (वय ५५, दोघेही रा. टाकळीभान) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी तालुक्यातील बेलापूर येथील कौशल्याबाई रामदास कदम यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा व सून दोघेही बेलापूर येथील घराची विक्री करून पैसे देण्याची माझ्याकडे मागणी करत आहेत.
घर नावावर करून देण्यासाठी दमदाटी करत आहेत. दोघेही शिवीगाळ करतात व अंगावर धाऊन येतात. सुनेने केस धरून मारहाण केली, असे कौशल्याबाई यांचे म्हणणे आहे. घरातील कपाटात ठेवलेले पाच तोळ्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर मुलगा व सून दोघेही निघून गेले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखांनाही पत्र लिहिले, असे कौशल्याबाई यांनी सांगितले. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.