अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वर राज्य संघटनेचे प्रतिनिधी मधून नियुक्तीझाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
पुणे येथे झालेल्या अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय अध्यक्ष आदिल सुमारीवाला व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत या निवडी बिनविरोध झाल्या.
तर महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या रिक्त झालेल्या पदावर प्रथमतःच दिनेश भालेराव यांची निवड एकमताने करण्यात आली. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमात महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी भालेराव यांचा सत्कार केला.
यावेळी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कबड्डी असोसिएशनचे विजयसिंग मिस्किन, धन्यकुमार हराळ, नंदकुमार शितोळे, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, मिठू काळे, कृष्णा लांडे, सचिन काळे,
सचिन नलगे, संतोष काळे, अमित चव्हाण, गुलजार शेख, प्रणव थोरात, प्रथमेश राऊत आदिंसह खेळाडू उपस्थित होते. महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर म्हणाले की,
दिनेश भालेराव यांनी ट्रॅक रेसर्स स्पोर्टस् फौंडेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहे. त्यांचा अनुभव व अॅथलेटीक्ससाठीचे उत्कृष्ट काम लक्षात घेता त्यांची झालेली निवड अभिनंदनीय व जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे.
या निवडीने क्रीडा क्षेत्रात नगरचे नांव उंचावले गेले असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध संघटना, खेळाडू व पालकांच्या वतीने उपस्थितांनी भालेराव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.