अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटकाळात पिडीत महिलांना आधार देणारी, चौकात उभी राहून बंदोबस्ताला सज्ज असलेली, ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारी, कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारी, गावा-गावात कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणार्या, महसुल विभागात ऑनलाईन तक्रारीचे निवारण करणारी, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देणारी, टाळेबंदी काळात बालविवाह रोखण्यापासून ते भाजी विक्री करणार्या व शेती फुलवणार्या कर्तुत्ववान महिलांचा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने कोरोनायोध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हॉटेल सुवर्णम प्राईड येथे न्यायाधार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बालविकास अधिकारी विजयामाला माने, गीता गिल्डा, निर्मला भंडारी, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या.
आरपीआयच्या आरती बडेकर, ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका प्रमोदीनी शिरसाठ, नागरदेवळे सरपंच सविता पानमळकर, वाहतुक पोलीस पुष्पा सोनवणे, महसुल विभागाच्या तृप्ती लगड, पत्रकार मनिषा इंगळे, कोरोना रुग्णांवर उपचार करणार्या डॉ. प्राजक्ता पारधे, रामकृष्ण विद्यालयाच्या प्राचार्या गीता गिल्डा,
सामाजिक कार्यकर्त्या जया पुंड, पुजा सोनवणे, महिला बाल विकास अधिकारी विजयामाला माने, घरकाम करणार्या सुनिता पाखरे, अंगणवाडी सेविका सुवर्णा रासकर, भाजी विक्रेत्या हसीना शेख, कृषी सहाय्यक अधिकारी उज्वला शेळके यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोरोनायोध्दा पुरस्कार देण्यात आला.
प्रास्ताविकात रेखाताई जरे पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात मोठ्या धैर्याने अनेक महिलांनी लढा दिला आहे. राजमाता जिजाजू व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेने अनेक धाडसी महिलांनी योगदान दिले असून, अशा महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. या भावनेने त्यांचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बालविकास अधिकारी विजयामाला माने यांनी यशस्विनी महिला ब्रिगेडचे महिलांसह सामाजिक प्रश्नावर सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. निर्मला चौधरी म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून, कोरोनाच्या संकटकाळात देखील स्त्रीयांनी आपले कर्तुत्व सिध्द केले आहे. महिलांच्या त्याग,
संयम व प्रेमळवृत्तीमुळे कोरोना सारख्या महामारीवर विजय मिळवणे शक्य झाले आहे. यामध्ये अनेक महिलांचा वाटा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी नारु रोगाच्या साथीत गावोगावी बारवा व विहीरी बांधून महिलाशक्तीचे दर्शन घडविले. त्यांच्याच प्रेरणेने कोरोनायोध्दे ठरलेल्या महिलांनी कार्य केले आहे.
अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी महिला ब्रिगेडने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले.
आभार यशस्विनी महिला ब्रिगेडच्या विद्यार्थी समन्वयक मनिषा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रोहीणी पवार, मंदाकीनी बडेकर-भगत, वैशाली नराल, जया गुंड, रोहीणी वाघिरे आदींनी परिश्रम घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved