Ahmednagar News : नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण विषयकपट्टणम महामार्ग क्रमांक ६१ या रखडलेल्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तिसगाव, देवराई, करंजी, मराठवाडी, जांबकौडगाव, निवडुंगे,
माळीबाभळगाव या ठिकाणचे रखडलेले बहुतांश कामे पूर्ण झाल्याने हा रस्ता आता प्रवाशांसाठी सुकर झाला असून, वाहन चालकाच्या वाहनाला देखील आता गती मिळाली आहे. करंजी ते नगर तीस किलोमीटरचे अंतर अवघ्या २५ मिनिटात पार केले जात असून,
रस्ता वाहतुकीला सुरळीत झाल्याने प्रवाशांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. कल्याण विशाखापट्टणम या ५२ किलोमीटर महामार्गाचे काम मेहेकरी ते फुंदे टाकळी पर्यंत आहे. यामध्ये सुरुवातीच्या सहा वर्षात २९ किलोमीटरचे काम करण्यासाठी तीन ठेकेदार बदलावे लागले आणि रस्त्याच्या कामाला तेव्हापासून खऱ्या अर्थाने मरगळ लागली.
त्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी सोलापूरच्या ठेकेदाराला उर्वरित रखडलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आणि उर्वरित २३ किलोमीटरचे काम या ठेकेदाराने सहा महिन्यात पूर्ण केले. ज्या ज्या ठिकाणी पूर्वीचे अडचणीचे रखडलेले काम होते ते देखील खासदार विखे पाटील यांनी मार्ग काढून त्या ठिकाणची देखील काम पूर्ण करून घेतले आहे.
विशेष म्हणजे पूर्वीच्या ठेकेदारांना काम करण्याअगोदर पैसे देण्यात आले मात्र आताचे ठेकेदाराला काम झाल्यानंतर पैसे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपासून पुढे पाथर्डी फुंदेटाकळी पर्यंतचे अनेक ठिकाणी रखडलेले काम आता पूर्णत्वास आले आहे.
महामार्गाचे काम अंतिम टप्यात आल्याने मराठवाडी बारव या ठिकाणी टोल नाका उभारण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली असून, आता नगर पाथर्डी मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवसांनी का होईना टोल भरूनच प्रवास करावा लागणार आहे.
नगर पाथर्डी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विशेष लक्ष घातल्याने या रस्त्याचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. रस्ता देखील वाहतुकीला सुरळीत झाला आह.
वाहन चालकांनी देखील वेगाची मर्यादा पाळून प्रवास करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, बंटी लांडगे, बाबा पाटील खर्स, संचालक अजय रक्ताटे, माजी सरपंच सुनील साखरे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवानेते भाऊसाहेब लवांडे,
सचिन वायकर यांनी केले आहे. मेहेकरी ते फुंदेटाकळी या ५२ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सुमारे एक १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता सहा वर्षात केवळ २९ किलोमीटर काम झाले. त्यासाठी तीन ठेकेदार बदलण्याची वेळ आली. तर आत्ताच्या ठेकेदाराने सहा महिन्यात २३ किलोमीटर काम पूर्ण करून या कामाला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.