शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढला त्यामुळे जमिनीची सुपिकता सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ढासळत आहे. जमिनी खारपड व चोपन होत आहेत.
उत्पादन खर्च वाढून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत असताना दुसरीकडे वर्षाकाठी हजारो लिटर तणनाशकांचा वापर होत आहे.
यामुळे तणांचा बंदोबस्त होत असला तरी सततच्या आति फवारण्यांमुळे जमिनीत पिकांना पोषक असलेले सूक्ष्म जिवाणू नाश पावत आहेत. तसेच पाण्याचे स्रोतही दूषित होत आहेत.
पूर्वी पिकांमधील तण काढण्यासाठी खुरपणी, कोळपणी हे उपाय केले जात परंतु कालांतराने शेती व्यवसायात विविध तंत्र व यंत्राचा वापर होऊ लागला. पिकांमध्ये गाजर गवत, तादुळजा, कुंजरू, दुधी, हजारदाणी, करडू, चिकटा यासारखी रुंद पानांची तर हरळी, कुंदा, शिप्पी, लेना, केना, लव्हाळा अशी एकदलवर्गीय तणे मोठ्या प्रमाणात आढळतात.
या तण नाशकांचा प्रसार हवा पाणी व पक्ष्यांच्या माध्यमातून सहज होत असतो. परंतु हरळी, नागरमोथा, कुंदा या तणांचा बंदोबस्त होत नाही. पिक वाढीच्या सुरुवातीलाच पिके तणमुक्त ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते म्हणून सध्या तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
यावर्षी पेरणीपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने पेरण्या वेळवर झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली आहे. उगवणपूर्व व उगवणीनंतरच्या तणनाशकांची जादा मात्रा झाल्यास कोवळ्या पिकांना इजा होऊन पिके वाया जाण्याचा धोका असतो.
त्यामुळे पिकांसाठी योग्य असलेल्या तणनाशकांचा वापर करून कोळपणीनंतर आवाढव्य होणारा औषधांचा खर्च टाळून तसेच यंत्राचा अधिक वापर करून तणांचा बंदोबस्त करावा, असा सल्ला कृषी विभागा कडून देण्यात येत आहे.