Ahmednagar News : अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना काल सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपी संतोष साबळे (वय ४५) पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला.
याबाबत पोलिसांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, संतोष आणि सुनिता साबळे यांचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्यात अनेक वर्षे चांगले चालले होते; मात्र दरम्यानच्या काळात संशयाहून घरात कायम वाद निर्माण होत होता.
हा वाद साबळे यास त्रासदायक वाटत होता. पत्नीचे वागणे चांगले नसल्याची भावना त्याच्या मनाला वारंवार खात होती. त्यामुळे कुटुंबात तणावपूर्ण परिस्थिती होती. सोमवारी सकाळी दोघे झोपेतून उठल्यानंतर ते एकमेकांचे आवरत होते.
या दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणाने वाद निर्माण झाला आणि संतोष साबळे याने पत्नीस शिविगाळ, दमदाटी सुरु केली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यानंतर रागाच्या भरात संतोषने घरातील कुऱ्हाड व कोयता घेऊन थेट सुनिताच्या डोक्यात मारला.
डोक्यात आणि कानाच्या मागे लागलेले घाव जिव्हारी लागला. संतोषचा राग इतका होता की, त्याने जीव जाईपर्यंत सुनिताला सोडले नाही.
घटना घडल्यानंतर आरोपी संतोषचा राग शांत झाला. राजुरपासून शिळवंडी हे अंतर जास्त असल्यामुळे तात्काळ उपचार करण्याचीदेखील संधी मिळाली नाही. त्यामुळे काही मिनिटांत सुनिताने जीव सोडून दिला. त्यानंतर संतोषने थेट पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार कथन केला. सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून आरोपी संतोष साबळे यास अटक केली आहे.
याप्रकरणी सुनिताचा भाऊ योगेश विष्णू बांबळे (रा. बांगेवाडी, कोतूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष साबळेच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२१/२०२४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा