अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-मी मुळात भटकाच आहे, कारण मी टाकून दिलेला माणूस आहे. निवारा बालगृहात आल्यामुळे मला माझ्या माहेरात आल्याचा आनंद झाला. असे प्रतिपादन निर्मलग्राम पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. जेष्ठ विश्वस्थ प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर, इकोनेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी भोपटकर, ऊस तोडणी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,
उद्योजक संदिप बोराडे, कोरो मुंबई चे सूर्यकांत कांबळे, उमाताई जाधव, अलकाताई जाधव आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलतांना पेरे म्हणाले की, काम करणाऱ्या माणसांना काही लोक नावे ठेवत असतात त्याकडे लक्ष न देता आपण आपले काम प्रामाणिक पणे केले पाहिजे.
माणसातच देव शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगून येत्या २६ जुलै रोजी माझ्या आईच्या स्मरणार्थ निवारा बालगृहातील मुलांना जेवू घालणार आहे. आणि मी ही त्यांच्या सोबत जेवणार आहे असे ते म्हणाले. वसंत मुंडे म्हणाले की, ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणजे उपेक्षितांचा आवाज आहेत.
आजचे खरे मुकनायक तेच आहेत. ज्यांच्याकडे अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत असते तोच माणूस जीवनात यशस्वी होत असतो. असे सांगून ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे ते म्हणाले. लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर म्हणाल्या की,
दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव स्मृती सांस्कृतिक पुरस्कार मला मिळाला याचा मला आनंद आहे. मात्र मी माझी कलावंत असलेली आई गमावली हे दुःख आहे. मात्र पुरस्काराच्या रूपाने आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहिल. ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो.
वंचित, निराधार, अनाथ, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे. आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच हे वसतिगृह चालते. याला शासनाचे कुठलेही अनुदान नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, महिला मंडळ फेडरेशन च्या अध्यक्षा मुमताज शेख, टोल ग्रुपच्या एच. आर. मॅनेजर जयंतीताई फडके, इकोनेट च्या गौरी ताई भोपटकर, उद्योजक संदिप बोराडे, कोरो मुंबई चे सूर्यकांत कांबळे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदींना यावेळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर यांना दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाहीर हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर दिलीप शिंदे, निवेदक उद्धव काळापहाड यांचा गौरव करण्यात आला. तर स्वयंसेवक अजिनाथ शिंदे (जामखेड), दादा शिंदे (इंदापूर),
नारायण गडई (नेवासा), कडूबा वाघ (पैठण), गोरख भोसले (मंगलवेढा) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाहीर भारत गाडेकर, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर दिलीप शिंदे, शाहीर हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर राजगुरू यांनी शाहिरी जलसा सादर केला. त्यांना प्रा. सचिन साळवे (हार्मोनियम),
राजेंद्र चव्हाण (ढोलकी), राहुल शिंदे यांनी तबल्यावर साथ संगत केली. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उदघाटन झाले तर राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी निवारा बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी विशाल नाईकवाडे, प्रा. शिवराज बांगर, प्रा. बाळासाहेब बळे यांचीही भाषणे झाली. बापु ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. द्वारकाताई पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे,
वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, प्रकाश शिंदे, संतोष भोसले, तुकाराम पवार, राजू शिंदे, छाया भोसले, पल्लवी शेलार, मनीषा काळे, रोहिणी राऊत, काजोरी पवार, सुनीता बनकर, जालिंदर शिंदे, विशाल पवार, लता सावंत, सारिका गोंडे आदींनी परिश्रम घेतले.