Ahmednagar News : जामखेड विधानसभेला पडलो, तरी आमदार झालो. माझा वशीला लावायला कोणीच नव्हते. बिगर वशिल्याचा मी पहिलाच आमदार आहे. जवळा गाव माझ्यामागे उभे राहिले नसते, तर मी येथे उभा नसतो.
पहिल्या पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले. तेथून सुरूवात झाली, ती इथपर्यंत आली. त्यामुळे जवळा गाव माझी कर्मभूमी असल्याची भावना आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळा येथे उपसरपंच प्रशांत शिंद मित्रमंडळाच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन झाले. त्यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले, जवळा गावाने मला भरभरून दिले.
त्यामुळे जवळा गावातील माणसाला कधी काही सांगायचे किंवा निवेदन देण्याची गरज पडली नाही. कोणते काम सांगितले आणि झाले नाही, असे कधी झाले नाही. न सांगता भरपूर निधी दिला.
जवळेश्वर मंदिर देवस्थानाच्या विविध विकासकामांसाठी निधी द्या, अशी मागणीही कोणी केली नाही. मात्र, तरीही दीड कोटींचा निधी दिल्याचे आ. शिंदे म्हणाले. प्रकाश महाराज बोधले म्हणाले, आ. राम शिंद हे खूप नबीबवान आहेत.
त्यांनी संघर्षातून उत्तंग शिखर गाठायचे काम केले. घरचा आणि घरातला आमदार काय असतो, हे दाखवून दिले. जामखेड तालुका हे राम शिंदे यांचे माहेर आहे. भाऊ असेल तर बहिणीच्या उतरंडीपर्यंत जाऊ शकतो, मात्र पाहुणा ओसरीलाच बसेल, असा टोला त्यांनी लगावला,
उपसरपंच प्रशांत शिंदे म्हणाले, अ आ. शिंदे यांनी जवळा गावासाठी मोठा निधी दिला. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगळे अनुभव आले. काही चुका होतात. मात्र, शिंदे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे जवळा ग्रामपंचायत निवडून आणून भाजपामध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. नीलेश गायवळ, शरद कार्ले, अमित चिंतामणी, उपसरपंच प्रशांत शिंदे, डॉ. दीपक वाळुंजकर, सरपंच सुशील आव्हाड उपस्थित होते.