Ahmednagar News : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत वाटते. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार असल्याचे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले.
तालुक्यातील गोरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या भूमिपूजनासह २७ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन, तसेच सेवा संस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण आ. लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब शिर्के, बाबासाहेब नांगरे, बबलू रोहोकले, चंद्रभान ठुबे आदी यावेळी उपस्थित होते.
लंके म्हणाले की, आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात संघर्षातून झाली. सत्तेचा वापर जनसामान्यांसाठी करायचा, या ध्येयातून राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा अभ्यास केला.
त्यामुळे गेल्या ४ वर्षांच्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मतदार संघात आणता आले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीयोजनेसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी बारकाईने लक्ष ठेवावे.
काम पूर्ण झाल्यानंतर तक्रार करून काही उपयोग नाही. पाणी योजनेचे काम दर्जेदार झाल्यास पुढे अनेक वर्षे पाण्याची अडचण येणार नसल्याचे लंके म्हणाले. प्रास्ताविक अंबादास काकडे यांनी, तर सूत्रसंचालन प्रकाश नांगरे यांनी केले.