Ahmednagar News : सर काही करा पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा.. मी त्या मुलीच्या घरी नांदायला जायला तयार आहे.. पण आपण मला लग्नासाठी मुलगी दाखवा.. अशी कळकळीची विनंती आहे एका तरुणाची.!नुकताच रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी दौंड मध्ये मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा पार पडला.
या वधू वर मेळाव्यामध्ये सर काही करा पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा अशी मागणी आयोजकांकडे तरुणाने केली. मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे व योगराज पॅलेसचे संचालक जितेंद्र अशोक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.
शिक्षणाची , वयाची अडचण..!
या वधुवर मेळाव्यास १००० पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते. एकूण २२४ नाव नोंदणी झाली. २२४ पैकी मुलींची संख्या अत्यल्प होती. यात फक्त १९ मुलींची नाव नोंदणी झाली तर २०५ मुलांची नाव नोंदणी झाली.
यामध्ये कमी शिक्षण म्हणजे बीए च्या आतील शिक्षण असलेल्या मुलांची संख्या फार आहे. परंतु बीए च्या आत शिक्षण असलेली एकही मुलगी मेळाव्यात नसल्यामुळे कमी शिकलेल्या मुलांना व शेतकरी मुलांना मुलीच मिळेनात अशा अवस्था झाली.
लग्नासाठी मुली मिळेनात अशी स्थिती साध्य सर्वत्र पाहायला मिळत आहे.
आयोजकांनी यावेळी सांगितले की, आत्तापर्यंत अनेक मेळावे घेतलेले आहेत. मेळाव्यात साधारणपणे एकास सहा, एकास सात असे मुला मुलींचे प्रमाण असते. पण या मेळाव्यात मात्र एकास दहा असे प्रमाण आहे.
ज्या मुलांचे शिक्षण बीए पेक्षा कमी आहे, शेती करतात आणि ज्यांचे वय ३० पेक्षा जास्त झालेल आहे, अशा मुलांची स्थिती सध्या विदारक असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.