अहमदनगर बातम्या

मी, शब्दाचा पक्का, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी जोमाने पुढे नेवू : ना. पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

मी, शब्दाचा पक्का आहे जर तुम्ही महायुतीचे आमदार निवडून दिले तरीही योजना यापुढे आणखीन जोमाने नेऊ, हा दादाचा शब्द आहे, असे वक्तव्य जाहीर सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी केले. अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचे काम करताना पैसे खाल्ल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.

सावेडी येथे महिला मेळाव्यात महिलांसोबत संवाद साधताना विविध विषयावर रोखठोक भाष्य केले. या कार्यक्रमाला कृषिमंत्री धनजय मुंडे, मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुणकाका जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेव नाहाटा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित
होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आम्ही जी योजना आणली त्याचे जर अधिकारी व कर्मचारी पैसे घेत असतील तर ते बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असं जर आम्हाला आढळलं तर आम्ही त्यांना सेवेतून बडतर्फ करू, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार आहोत.

ज्या गरीब मायमाऊली आहेत, त्यांच्या काही गरजा भागविण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकांतील महिलांना यायोजनेचा लाभ दिला जाणार आहे.

जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून महणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना देखील वीज मोफत देणार असून, सौर प्रकल्पासाठी सुद्धा आता अनुदान देणार आहे.

तसेच महिला बचत गटांना ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहोत. राज्यातील महिलांना तीन चाकी रिक्षा आम्ही देत आहोत, या योजनेमध्ये नगर जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. नगर जिल्ह्यात देखील ३०० रिक्षा या महिलांना देणार आहोत. या संदर्भात राज्य सरकार महिलांना अनुदान देणार आहे.

दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी राज्यातील २५ लाख रिक्षा चालकांच्या संदर्भात निवेदन दिले होते. रिक्षा चालकांच्या परवाना शुल्क दंड संदर्भात देखील राज्य सरकार गंभीर आहे. रिक्षा चालकांना होणार दंड देखील रद्द करण्यासंदर्भात विचार करत असल्याचे पवार यांनी सांगितले.

येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका बहिणीने मला राखी बांधली. आमचा निश्चय आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय-माऊलीच्या अकाऊंटला ३ हजार रुपये जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत. इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात. ज्या गरीब महिला आहेत, त्यांच्यासाठी ही योजना सुरु केली आहे, असेही ना. पवार म्हणाले.

Ahmednagarlive24 Office