अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-जामखेड तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. मुली व महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’सह टू प्लस योजना राबवण्यात येणार आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार घेतली नाही, तर नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ग्रामसुरक्षा दल सक्षम करून रात्रीची गस्त वाढवण्याबरोबर खासगी सावकारकीचा बीमोड करायचा आहे.
अवैद्य धंदे, गावठी कट्टे यांची माहिती मला कळवा, लगेच कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून मुली व महिलांवरील अत्याचारांना आळा घातला जाणार आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येईल. गस्तीसाठी एनसीसी छात्र, निवृत्त सैनिक व नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे, असे गायकवाड म्हणाले.