Ahmednagar News : ‘ते’ कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडता आले नसते !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या जेलच्या बराकीत सीसीटीव्ही नाहीत. मात्र, बराकी बाहेरच्या पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत. बराकी बाहेर चॅनेलचे गेट आहे. आरोपी पसार झाले, त्यावेळी हे गेट फक्त लोटून घेतले होते. त्याला कुलूप नव्हते, ही माहिती समोर येत आहे.

जर या चॅनेल गेटला कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडण्यास मज्जाव झाला असता. दरम्यान, संगमनेर संगमनेर जेलमधून गज तोडून पसार झालेल्या ४ आरोपींमुळे जेल प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे.

संगमनेर तालुक्यात ४ प्रमुख पोलिस स्टेशन आहे. यापैकी आश्वी घारगाव, संगमनेर शहर व संगमनेर तालुक्याचे घुलेवाडी येथे पोलिस स्टेशन आहे.

या सर्व पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील ५६ आरोपी संगमनेर शहर पोलिस स्टेशन लगत असलेल्या जेलमध्ये आहेत. त्यामुळे या चारही पोलिस स्टेशनचा प्रत्येकी १ कर्मचारी या जेलच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

संगमनेरच्या घडलेल्या घटनेमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच कारागृहापर्यंत पोलिसांनी कोणालाही येऊ दिले नाही. बाहेरील जेवणासाठी असणाऱ्या ठेकेदाराशिवाय कुणालाही जवळपास फिरकू दिले नाही.

आरोपींच्या नातेवाईकांनाही भेटण्यास नाकारले. यावेळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात आरोपींचे नातेवाईक बसून होते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भगवान मथुरे हे दोन्ही अधिकारी आरोपींच्या शोधात होते.