अहमदनगर बातम्या

Ahmednagar Vibhajan : नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Vibhajan : श्रीरामपूर येथील श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा,

या मागणीसाठी उद्या शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, मेनरोड, श्रीरामपूर शहर येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.

सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथून निघून मेनरोड मार्गे- भगसिंग चौक – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक – गिरमे चौक – तुळजाभवानी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा गांधी पुतळा – श्रीराम मंदिर चौक, असा निघणार असून मेनरोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप होणार आहे.

पूर्णपणे लोकशाही मार्गाने होणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीबाबत लक्ष वेधण्यात येणार आहे.

तसेच नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे ठाम मत असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले.

तसेच शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरज आगे यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने, श्रीरामपूर ह्या नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. त्यामुळे हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा,

यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने काढत असलेल्या व बिगरराजकीय नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या चार महिन्यापासून चालू असलेल्या श्रीरामपूर जिल्हा मोहिमेला देखील श्रीरामपूरकरांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रचंड मोठ्या संख्येने श्रीरामभक्त-शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे.

Ahmednagarlive24 Office