अहमदनगर बातम्या

महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राहाता परिसरात जवळपास ६० टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे.

लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषी पंपाची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता परिसरातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असे संजय सदाफळ यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सदाफळ यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शेतीमालाची विक्री करण्यासाठी चांगले बाजारभाव मिळाले नाहीत.

परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. राहाता परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यावर अनेक कुटुंबियांची उपजीविका चालते.

राहाता परिसरातील बाजारपेठेचे अर्थकारण शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी हरभरा, गहू मका ही पिके शेतामध्ये पेरली आहेत.

तसेच राहाता परिसरात ऊस, पेरू, चिकू, डाळिंब, द्राक्षे या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊननंतर शेतीमालाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या हेतूने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागत व बी खरेदी करून शेतामध्ये रब्बी पिकांची पेरणी केली असून बियाणे उगवण्यासाठी शेतकऱ्यांची दिवस रात्रीची पर्वा न करता शेतीमालाला पाणी देण्याचे काम करीत आहे.

मात्र महावितरण कंपनीने राहाता परिसरातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे.

महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी अन्यथा राहाता परिसरातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office