आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे; परंतु सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरीकांच्या आनंदावर गदा येत आहे. रेशन दुकानावर तासन्तास थांबण्याची वेळ शिर्डी, साकुरीसह राहाता तालुक्यातील अनेक रेशन दुकानांत नागरीकांवर आली.

आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग? अशा उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी सण नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहाण्याची वेळ आला आहे.

तो साजरा करण्यासाठी रेशन दुकानातून आनंदाचा शिधा घेण्याकरिता लाभार्थी नागरिक गर्दी करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी सर्व्हर स्लो चालत असल्याने कामकाज गतीने होत नाही. परिणामी आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

ऐन महिला दिवाळीत भगिनींना घरची कामे सोडून रांगेत खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे. रांग सोडून जावे तर वेळेत शिधा मिळेल की नाही, ही भीती आणि थांबावे तर घरची कामे बुडतात, अशा कात्रीत महिला भगिनी अडकल्या आहेत.

धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती झाली आहे. रेशन धान्य दुकानातील कर्मचारी व वितरित करणारे सेल्समन यांच्यापुढेसुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. काहींना आपल्या कामांमुळे वेळेत शिधा न मिळाल्याने रिकाम्या हाती जाण्याची वेळ आली आहे.

सामान्यांच्या वेळेला किंमत नाही

आनंदाचा शिधा घेऊन जाणारे बहुतांशी लोक गरीब, हातावर पोट असणारे असतात. रोज कमवायचे व खायचे असा त्यांचा दिनक्रम असतो. अशा परिस्थितीत आनंदाचा शिधा घेण्यासाठी आपला रोजगार बुडवून यावे लागते.

त्यात सर्व्हर डाऊन असल्यास तो दिवस जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी जायची वेळ येत असेल, तर तो शिधा काय भावत पडेल. त्यामुळे सामान्यांच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

ज्यावेळी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आनंदाचा शिधा वितरित करताना सहर डाऊन झाले अथवा स्लो चालत असेल तर अशा वेळी ऑफलाइन रेशन देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. म्हणजे नागरिकांना तासन्तास रेशन घेण्यासाठी थांबण्याची वेळ येणार नाही आणि त्यांचा वेळ वाया जाणार नाही. प्रशासनालाही दोष लागणार नाही. सर्व्हर डाऊनच्या काळात ऑफलाईनने शिधा देण्याची पद्धत अवलंबावी. – वाल्मिकराव बावचे, सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी