अहमदनगर बातम्या

तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  महाराष्ट्र शासनाच्या दि.8 व 14 ऑक्टोंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन कवचकुंडले’ या विशेष लसीकरण मोहीमेसाठी शिर्डी उपविभाग प्रशासन सज्ज झाले आहे.

या मोहीमेत गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण कॅम्प लावून दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर १८ वर्षे पुढील सर्व वयोगटांचे दुसऱ्या डोससह १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.

त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. या मोहिमेला आजपासून शिर्डी उपविभागातील राहाता व कोपरगांव या दोन्ही तालुक्यांमध्ये सुरूवात झाली आहे.

यासाठी महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद व नगरपरिषद प्रशासनाचे एकमेकांच्या समन्वयाने जय्यत तयारी केली आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन मिशन कवचकुंडले मोहिमेसाठी मिशन मोडवर काम करत आहे. राहाता तालुक्यांमधील गावांमध्ये दररोज 15 हजार कोवीड डोसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे.

तसेच कोपरगांव तालुक्यात 3900 डोसचे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच कोपरगांव शहरातील 6 मस्जीदींमध्ये दररोज 1800 डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोपरगांव ग्रामीण रूग्णालयात दररोज सर्व नागरिकांसाठी 1000 डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोपरगांव व राहाता मधील प्रत्येक गावांमध्ये लसीकरणाबरोबरच कोरोना प्रतिबंध व जनजागृती करण्यासाठी ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. लसीकरणापूर्वी गावोगावी दवंडी, विद्यार्थ्यांच्या रॅली व ध्वनिक्षेपकांवरून जनजागृती करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office