Ahmednagar News : पती असावा तर असा ! पत्नी झोपलेली, बिबटयाने तिच्याकडे झेप घेतली, पतीने चाबकाने बिबट्याला फटकारले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पती पत्नीचे जन्मोजन्मीच्या रेशीम गाठी जुळलेल्या असतात. ती संसारासाठी तर पती संसार उभा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात.

पण एकमेकांवर संकट आले तर मात्र दोघेही एकमेकांना साथ देतात.. अगदी जीवाची पर्वा न करता.. असच काहीस अहमदनगर जिल्ह्यात घडलं आहे.

ऊस तोडीसाठी शेताच्या दिशेने ऊस तोडणी कामगार बैलगाडीतून चालले होते. बैलगाडीत गाडीवानाची पत्नी झोपलेली होती. अचानक एक बिबट्या त्या महिलेकडे झेप घेत हल्ला करण्याच्या तयारीत होता.

प्रसंगावधान राखून गाडीवानाने तात्काळ हातातील चाबकाने बिबट्याला फटकावले, आरडाओरड केला. आजूबाजूच्या लोकांनी त्या दिशेने धाव घेतली आणि बिबट्याने पळ काढला. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. भगवतीपूर शिवारात ही घटना घडली.

ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील भगवतीपूरमध्ये पहाटे घडली. या भागात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू आहे. पाच मोऱ्याकडून रामपूर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने ऊस तोडणी कामगार बैलगाडीतून चालले होते.

उसाचे शेत अजून लांब आहे म्हणून महिला बैलगाडीत झोपली होती. तिचा पती बैलगाडी हाकत होता. अशातच रस्त्याकडेला बिबट्या दबा धरून बसलेला होता. बिबट्या गाडीत झेप घेऊन हल्ला करण्याच्या पवित्र्यात असतानाच गाडीवानाने तात्काळ आपल्या हातातील चाबकाने बिबट्याला फटकारायला सुरुवात केली. आरडाओरड केली.

पहाटेच्या वेळी गुरादूरांचा चारापाणी करण्यासाठी शेतकरी उठलेले होते. आसपासच्या लोकांनी हा आवाज ऐकला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली आणि आरडाओरड करीत बिबट्याला पिटाळून लावले. दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून महिला बचावली.

लोणी, सादतपूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलांना प्राण गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असताना भगवतीपूरमध्ये हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी कडसकर वस्तीवर रात्री स्वप्निल कडसकर यांच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला केला होता.

सुदैवाने त्यात ते थोडक्यात बचावले. कोल्हार भगवतीपूर परिसरात ठिकठिकाणी शेतामध्ये तसेच रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करण्याचे प्रकारही दररोज घडत आहेत. अशातच आता नरभक्षक बनलेल्या बिबट्यांचे माणसांवर हल्ले होऊ लागले आहेत ही बाब चिंताजनक आहे.

Ahmednagarlive24 Office