अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात येत्या काळात निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहे याची झुळूक आता हळूहळू पसरू लागली आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची देखील धावपळ सुरु झाल्याचे पाहायला मिळते आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १५ टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडय़ात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्येबाबत येत्या 30 तारखेपूर्वी निर्णय घ्यावा त्यानंतर आयोग कोणताही बदल स्वीकारणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सरकारला कळविल्यामुळे सरकारच्या पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग वाढीस मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग वाढीस मंजुरी दिली गेल्यास त्याचा लाभ येत्या काही महिन्यात होणार्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, देवळाली, कोपरगाव, पाथर्डी,
नगरपालिका आणि शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवकांची संख्या लोकसंख्या वाढीच्या तुलनेत 2 ते 5 पर्यंत वाढू शकते. दरम्यान राज्यात सध्या मुंबईसह 27 महापालिका आणि 379 नगरपालिका नगरपंचायती आहेत.
दर 10 वर्षांनी होणार्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते. सध्या सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान 16 तर जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान 65 तर जास्तीत जास्त 175 पर्यंत आहे. मुंबई महापालिकेत ही संख्या 227 आहे.