कुत्तरवाडी तलावातून पाणी उपसा असाच चालू राहिल्यास पाणी टंचाईचा धोका ! पिण्याचे पाणी मिळणेही होऊ शकते कठीण…

Updated on -

११ मार्च २०२५ तिसगाव : कुत्तरवाडी (ता. पाथर्डी) तलावातून राजरोस कृषि पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.परिणामी, तलावातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे.पाण्याचा उपसा तातडीने थांबवावा,अन्यथा तलावावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

फेब्रुवारी पासूनच तालुक्यातील पाणी साठवण्याचे विविध स्रोत संपण्याच्या मार्गावर आहेत.काही गावांमध्ये पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडून पाण्याची मागणी आता वाढू लागली आहे.अशात कुत्तरवाडीच्या मध्यम प्रकल्पातील मृत साठ्यातून शेकडो शेतकऱ्यांनी कृषि पंपाद्वारे पाईपलाईनने शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू केला आहे.

त्याकडे लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी उपसा असाच सुरू राहिल्यास उन्हाळ्यात लोकांना पाणी पिण्यासाठी राहणार नाही. जानेवारीतच जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागास निवेदन देण्यात आले होते. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

या तलावातुन महिंदा, लमाण तांडा, चिंचपूर इजदे व कुत्तरवाडी या गावांना पाणीपुरवठा होतो. भविष्यात पिण्यासाठी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थ कोणत्याही क्षणी तलावावर उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

यशवंत दहिफळे, महादेव सोनवणे, सुनिता दहिफळे, ज्योती दहिफळे, कालिदास दहिफळे, अरुण दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, राजेंद्र दहिफळे, ज्ञानदेव दहिफळे, ज्ञानेश्वर पालवे, पप्पू गोसावी आदीसह ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe