अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे
चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.(Shirdi News)
श्रीमती बानायत म्हणाल्या, राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले होते.
त्यानुसार श्री साईबाबांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले होते. परंतु सध्या देशात व राज्यात करोना विषाणूचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता पुन्हा राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत.
त्यानुसार 25 डिसेंबर 2021 रोजी पासून रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केलेली आहे.त्याअनुषंगाने संस्थानच्यावतीने रात्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी भाविकांना बंद ठेवण्यात
येणार असल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्रीही श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
तसेच राज्य शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री 10.30 वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची 04.30 वाजताची काकड आरती नियमित होणार असून
याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच श्रींच्या दर्शनाकरिता सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.