Ahmednagar News : वडिलोपार्जित संपत्तीच्या तसेच जमिनीच्या वादातून अनेकदा सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे.
नुकतीच नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यात जमिनी आणि विहिरीच्या वादातून सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावात घडली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
अशीच संपत्तीच्या वादातून मारामारीच्या घटना नगर जिल्ह्यात देखील घडत आहेत. दरम्यान झाड तोडण्याच्या कारणावरुन सख्ख्या भावाने भावाला शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे घडली आहे. यामुळे संपत्तीच्या वादातून वाद होण्याच्या घटना वाढत चालल्या असल्याचे दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथील भाऊसाहेब मुक्ता बाचकर (वय ५९ वर्षे) रावसाहेब मुक्ता बाचकर हे दोघे सख्खे भाऊ असून राहुरी तालुक्यातील गंगाधर वाडी, वावरथ जांभळी, ता. राहुरी, येथे कुटुंबासह राहतात.
दरम्यान दि. २१ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजे सुमारास रावसाहेब मुक्ता बाचकर हा शेतातील आंब्याच्या बागेमधील झाड तोडत होता. तेव्हा भाऊसाहेब बाचकर यांनी त्याला तू हे झाड का तोडले, अशी विचारणा केली.
याचा राग आल्याने रावसाहेब बाचकर याने भाऊसाहेब बाचकर यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. तसेच तु जर माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
याबाबत भाऊसाहेब मुक्ता बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ रावसाहेब मुक्ता बाचकर (रा. वावरथ जांभळी, ता. राहुरी) याच्यावर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .