मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात मुळा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू आहे. मुळा नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर होत असून पोलीस यंत्रणा व महसूल विभागाने वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, राहुरी स्टेशन परीसर हे अवैध वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे. मुळा नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे पडलेले असताना महसूल विभागाने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा वाळूतस्करांना रोखण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. नदी पात्रातून बैलगाडीच्या साहाय्याने वाळूचा उपसा करून ट्रक, टेम्पो, डंपर यांच्या साहाय्याने वाळूची वाहतूक केली जाते. वाळूची तस्करी कशा पद्धतीने चालते हे महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांना चांगल्या प्रकारे माहिती असूनही नावापुरती कारवाई करण्यात येते. . मात्र वाळूची वाहतूक पुर्णपणे रोखण्यात महसूल विभाग व पोलीस यंत्रणा कमी पडत आहेत.

राहुरी तालुक्यात बेकायदा वाळूचा उपसा करून वाळूतस्कर दहशत निर्माण करत असताना कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही दिसत आहे. वाळूच्या व्यवसायात कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगार तरूण यात उतरत आहेत. वाळूच्या व्यवसायातून अनेक रक्तरंजित घटना तालुक्यात घडलेल्या असल्याने महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांना कधी जाग येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महसूल विभागाचे अधिकारी कार्यालयात कधी असतात, बाहेर कधी पडतात याची माहिती ठेवण्यासाठी वाळूतस्करांची खास यंत्रणा जागोजागी तैनात आहे. मुळा नदी पात्रातील वाळूचा जाहीर लिलाव करण्यास एका बाजूला तीव्र विरोध केला जातो. वाळूचा कणही उचलू दिला जाणार नाही, असा निर्धार करणारे अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी मात्र पुढे येत नाहीत.

अवैध वाळूचोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो, अशी वास्तविकता आहे. राहुरी तालुक्याचा बागायती पट्टा म्हणून ओळख असलेला मुळा नदी काठावरील गावांचा परीसर बकाल झाल्याचे दिसत असून मुळा नदी पात्राचे वाळवंट होत आहे.

मुळा नदी पात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राहुरी तालुक्यातील बेकायदा वाळूचा उपसा रोखण्यासाठी महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सूज्ञ नागरिक व नदी काठावरील शेतकरी वर्गातून होत आहे.