अहमदनगर कोपरगाव रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग्ज ! दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. तर ७५ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे होर्डिंग्ज सुरक्षित उभारलेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेची आहे. येथेही अशी दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची आहे.

मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा व पावसाने होर्डिंग कोसळले. यात १६ निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला. अनेक गंभीर जखमी झाले तर अनेक सुदैवाने बचावले. वाहन व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले; मात्र अद्यापही बीएमसी व रेल्वे पोलिस यांच्यात हद्द कुणाची यावर वाद होत आहेत; परंतु गेलेल्या जीवनविषयी कुणीही विचार करताना दिसत नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या होर्डीग्जचा प्रश्नही ऐरणीवर आला असून खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

नगर- कोपरगाव रस्त्यावर जागोजागी मोठमोठे अनेक होर्डिंग दिमाखात उभे आहेत; मात्र यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीत रितसर परवानगी आवश्यक असते. ती परवानगी घेतली आहे का? घेतली असेल तर नियमाप्रमाणे खोलवर खांदून होर्डिंगस उभारलेत का, याची शहानिशा संबंधित प्रशासनाने करणे गरजेचे आहे. नियमांना बगल देत अनेक व्यवसायिक असे होर्डिंग्ज रस्त्याच्या दुतर्फा उभारतात;

परंतु याकडे अनेक वेळा दूर्लक्ष होते. किती खोलवर होर्डिंगसची पायाभरणी केली आहे, याची शहानिशा होत नाही आणि हीच प्रशासनाची बेजबाबदार वृत्ती अनेकांना मृत्यूच्या खाईत घेऊन जाऊ शकते. मुंबई येथे घडलेल्या या अपघातानंतर भविष्यात होणारे होर्डिंगसचे अपघात टाळण्यासाठी नगर- कोपरगाव रस्त्यावर उभारलेल्या सर्व होर्डिंगसची शहानिशा करणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आदी संस्थांसह बांधकाम विभागानेही याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा मुंबई येथील घाटकोपर मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास विलंब लागणार नाही.

स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक

नगर- कोपरगाव रस्त्यावर उभे असलेले होर्डिंग्ज कायदेशीर अथवा बेकायदेशीर आहेत, याबरोबरच त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाने पाऊले उचलणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe