महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक ! राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-   महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू आहे. वाळूतस्करीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांचे पदाधिकारी सहभागी असल्याची चर्चा आहे.

राजकीय नेत्याच्या संपर्क कार्यालयातील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांचा वाळूतस्करीमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्याकडून महसूल अधिकाऱ्यांना फोन जात असल्याने महसूल अधिकारी वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी कचरत असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरालगतच्या नर्सरी भागातून रात्री वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती, मात्र दोन दिवसांपूर्वी नर्सरीमध्ये मोठे वाद निर्माण झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लक्ष घातल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे. या परिसरातील वाळू उपसा बंद करण्यात आलेला आहे.

वाहनचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने वाळू वाहनांमुळे अनेकदा अपघात होत आहेत. संबंधित गावचे तलाठी, मंडलाधिकारी व तहसीलदार या सर्वांचे या वाळूतस्करीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यामुळे वाळूतस्करांचे चांगलेच फावले असून त्यांची मुजोरी वाढली आहे.

वाळू वाहतुकीस विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना काही वाळू तस्कर दहशतीची भाषा वापरत असल्याने, परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील पठार भागातील मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असताना संगमनेर शहरालगतच्या नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे.

शहरातील नदीपात्र सोबतच नदीपात्रालगतच्या संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, मंगळापुर, जोर्वे, निंबाळे या गावांतूनही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. रात्रभर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची लगबग सुरू असते. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउपसा सुरू आहे.

प्रवरा नदीपात्रातून होणाऱ्या वाळू तस्करी मध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही थेट संबंध असल्याने महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही या वाळूतस्करीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवरा नदीवरील मोठ्या पुलापासून काही अंतरावरच वाळूतस्करी सुरू आहे.

या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने भविष्यात नदीवरील पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही वाळूतस्कर या ठिकाणाहून रात्री वाळूची वाहतूक करत असतात. रात्रपाळीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. यातील काही जणांना पोलिसांनी मोकळीक दिल्याची चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe