अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर शहर व परिसरातून सध्या दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरमधून वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.
वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारीही वाळू तस्करीमध्ये सहभागी असल्याने महसूल कर्मचारी व अधिकार्यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे.
संगमनेर तालुक्यातील मुळा, प्रवरा व म्हाळुंगी या नदीमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात येतो. तालुक्यातील पठार भागातील मुळा नदीपात्राच्या गावांमधून वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जाते.
संगमनेर शहर व परिसरातील गावांमधून प्रवरा नदी वाहते. संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, जोर्वे, मंगळापूर, खांडगाव या नदीपात्रातून गावांमधून वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
खुलेआम वाळू उपसा होत असतानाही तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वाळू तस्करीमध्ये सत्ताधारीसह विरोधी पक्षांच्या काही पदाधिकार्यांचाही सहभाग असल्याने
या व्यवसायाकडे महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू उपशात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.