Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवून मंडलाधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे.
या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काल गुरूवारी (दि.१८) दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरु होते. सदरचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभरामध्ये काम बंद आंदोलन सुरु केले जाईल, असा इशारा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राजेश घोरपडे यांनी दिला आहे.
सदरचा निलंबनाचा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी काल गुरूवारी (दि.१८) दिवसभर तलाठी व मंडलाधिकारी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून होते. (दि.१४) जानेवारी रोजी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर जी कारवाई झाली.
त्या कारवाईच्या वेळेस व पंचनाम्याच्या वेळी ते उपस्थित होते. त्यामुळे मंडलाधिकारी व तलाठी या दोघांचे निलंबन हे अन्यायकारक असल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने सुरु केलेल्या कामबंद आंदोलन काल गुरूवारी दुसऱ्या दिवशीही सुरुच होते.
या संदर्भात काल (दि.१८) सायंकाळी संघटनेच्या वतीने शिर्डी येथे जावून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासही निवेदन देण्यात आले आहे. निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभर कामबंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत हासे, राज्य उपाध्यक्ष संतोष तनपुरे, जिल्हा सचिव महेश सुद्रीक, राजेश घोरपडे, बाबासाहेब कदम, संजय डाके आदींसह जिल्हाभरातील तलाठी व मंडलाधिकारी उपस्थित होते.