Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांवर कारवाया करण्यात येणार असून. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे दिसून येतील त्या प्रभारींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाईचे आदेश देताच तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने शनिवारी दिवसभरात चार कॅफेंवर छापे मारले.
यातील गुलमोहर रोडवरील हाय प्रोफाईल स्पा सेंटरवर छापा मारला असता, यावेळी अनेक बड्या घरातील तरुण तरुणी अश्लील चाले करताना आढळून आले. या बड्या घरातील तरुण तरुणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, एक महागडी कारही जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नुकतेच खासदार नीलेश लंके यांनी पोलिस प्रशासनाविरोधात चार दिवस उपोषण केले. उपोषणादरम्यान पोलिस प्रशासनाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. पोलिसांच्या कारभाराबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिक परिक्षेत्राचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आश्वासनानंतर लंके यांनी उपोषण मागे घेतले. पोलिस प्रशासनाविरोधात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व विभाग, पोलिस ठाण्यांच्या प्रभारींची बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
एवढेच नाहीतर, पोलिस अधीक्षक ओला यांनी शनिवारी पोलिस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी कारवायांचा आढावा घेऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचा आदेश दिला.
या भागात एक जरी अवैध व्यवसाय असल्याचे आढळून आले किंवा कुणी तक्रार केल्यास प्रभारींना जबाबदार धरून कारवाई केली जाईल. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे आता त्या – त्या ठाण्यातील कर्मचारी कामाला लागले आहेत.