Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी (दि.२८) प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भिम शक्ती संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे यांनी दिला आहे.
या संदर्भात येथील प्रांताधिकारी किरण सावंत यांना विजया बारसे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. याप्रसंगी वंदना गायकवाड, कल्पना तेलोरे, जयश्री पवार, सनी बारसे, अश्विनी साळवे, इनायत अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विजया बारसे म्हणाल्या की, तालुक्यातील वांगी शिवारात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. यापुर्वी चार डंपर तसेच एक जेसीबी महसूल अधिकाऱ्याने पकडले होते. परंतु ते अधिकाऱ्यांनी सोडून दिले आहे.
दरम्यान, अनधिकृत वाळू तस्करी विरोधात कोणालाही सुट्टी देऊ नका, असे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. त्याला तालुक्यातील महसूल अधिकारी यांनी केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे.
त्यामुळे संबधित अधिकारी व ठेकेदार डंपर चालक-मालक यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.