संपूर्ण बाजारपेठ तातडीने अतिक्रमण व समस्यामुक्त करा! …अन्यथा तीव्र आंदोलन करू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहराची ओळख असलेली बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. नगरचा कापडबाजार तर पूर्वीपासून राज्यात वेगळे स्थान मिळवून आहे.

मात्र गेल्या काही वर्षात या बाजारपेठेला ग्रहण लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण बाजारपेठेचा परिसर अतिक्रमण व समस्यामुक्त करा. अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.

या निवेदनात नमूद केले आहे की, नगरची बाजारपेठ गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा सामना करीत असून, प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास व्यापारी आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. आपण स्वतः जिल्हाधिकारी तथा मनपाचे आयुक्त म्हणून काम करताना अतिशय ठसा उमटवणारे काम करून सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेत आहात.

आपल्या कारभारामुळे मनपा प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आली आहे. त्यामुळे आता प्राधान्यक्रमाने नगर शहरातील बाजारपेठेचा अनेक वर्षांपासून कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी पावले उचलावीत. महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जाग येईल तेव्हा बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवते.

मात्र अनेकदा पथक येण्याची टीप फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना आधीच मिळते. त्यामुळे ते आधीच गाशा गुंडाळतात. अनेक वेळा मनपाची अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच अवघ्या काही मिनिटात विक्रेते पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करतात.

अनेक वेळा मनपाचे पथक बुधवारी बाजारपेठ बंद असलेला दिवस निवडून त्या दिवशी दिवसभर बाजारपेठ तैनात राहते. त्या दिवशी बाजार,  बाजारातील बहुतांश दुकाने बंद असतात, विक्रेतेही नसतात, त्या दिवशी कारवाई करण्यातून नेमके काय साध्य होते? हा मुळातच विचार करण्यायोग्य प्रश्नच आहे.

महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे व रस्त्यावर अवैद्य रित्या व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आता सर्वांनाच ज्ञात झालेला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आपण दीर्घकालीन नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी केल्यास बाजारपेठेतील रस्ते मोकळे होण्याबरोबरच व्यापार्‍यांना या रस्त्यावरील विक्रेत्यामुळे होणारा त्रासही कमी होईल.

सध्या संपूर्ण बाजारपेठेतील रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ग्राहकांना बाजारपेठेत येऊन खरेदी करण्याची इच्छा असली तरी वाहतूक कोंडी, रस्त्यावरील विक्रेत्यांची अरेरावी, त्यामुळे ते उपनगरांमध्येच खरेदी उरकून घेतात.

त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर होत आहे. अनेक दुकानदार, व्यावसायिकांची मोठी गुंतवणूक करून बाजारपेठेत जागा घेतल्या आहेत. शोरूम थाटल्यावर मोठा खर्च केलेला आहे. परंतु, बाजारपेठेत ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ ओस पडू लागली तर शहराचा विकास कसा साधता येऊ शकेल. बाजारपेठेतील दुकानांमध्ये हजारो सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

ग्राहक नसल्यास व्यावसायिकांनाही अशाप्रकारे रोजगार देणे शक्य होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेचा श्वास कोंडला गेला आहे. याबाबत वेळोवेळी विविध व्यासपीठावरून आवाज उठवण्यात आला आहे. तरी याबाबत आपण योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24