प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन विकसित भारत संकल्प यात्रा’ हा उपक्रम संपुर्ण देशभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वय राखत या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून उपक्रम यशस्वी करावा.
या उपक्रमाद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती तर दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन ‘विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचुन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातुन सरकारच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यात येऊन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशिलपणे काम करावे. शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवून लाभार्त्याना प्रत्यक्ष योजनांचा लाभ देण्यात आला.
त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिक, महिला बचतगटातील महिला, महाविद्यालयिन विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांना सहभागी करून घेत भव्य अश्या कार्यक्रमातून योजनांची अधिक प्रभावीपणे जागृती करत योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्त्याना देण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागामध्ये सकाळी व संध्याकाळच्या वेळेस नागरिक उपलब्ध असतात. त्यामुळे ही यात्रा त्याच वेळेत गावांमध्ये पोहोचेल याची दक्षता घ्यावी. यात्रेचे वेळापत्रक ठरवताना पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यात यावे. येत्या २६ जानेवारीपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात यात्रा पोहोचून सरकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच लाभार्त्याना प्रत्यक्ष लाभ देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.