Ahmednagar News : काही लोक दर्शन पाससाठी दुप्पट तिप्पट पैसे घेऊन साईभक्तांची फसवणूक करतात, या पार्श्वभूमिवर ही फसवणूक रोखण्यासाठी साईबाबा संस्थानने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पेड पास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
त्यामुळे पासच्या नावाखाली होणारा काळाबाजार रोखला जाणार आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की देशभरातून नव्हे, तर जगरातून लाखो साईभक्त रोज शिर्डीत साईचरणी लीन होण्यासाठी येतात. अनेक जण येथे आल्यानंतर आरतीच्या व पेड दर्शनाच्या पाससाठी रांगेत उभे राहातात.
याचाच फायदा काही एजंट लोक घेतात आणि या माध्यमातून साईभक्तांची फसवणूक केली जाते. दर्शनाच्या रांगेत अनेकदा खूप गर्दी असते. त्यामुळे काही साईभक्त पेड दर्शनाचा मार्ग निवडतात; मात्र हे पास घेण्यासाठीही रांगेत उभे राहावे लागते.
यासाठी थोडा वेळ जातो. याचाच फायदा काही लोक घेतात व या पाससाठी दुप्पट, तिप्पट पैसे भाविकांकडून उकळले जातात. या माध्यमातून साईभक्तांची फसवणूक होते. काही एजंट भाविकांची या माध्यमातून फसवणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी साईबाबा संस्थान प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबाईटवरही ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध आहे, मात्र बऱ्याच वेळा येथून पास काढण्यासाठी अडचणी निर्माण होतात. पेड दर्शन पास व आरती पासेससाठी फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर साईबाबा संस्थानने हे होऊ नये म्हणून काही पाऊले उचलली आहेत.
सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठलेही ओळखपत्र आवश्यक नसले, तरी पेड दर्शन पास व पेड आरती पासेससाठी आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर असणारे सॉफ्टवेअर साईबाबा संस्थानने विकसित केलं असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
पेड दर्शन पास या वेबसाईटवरून काढताना ओळखपत्राचीही नोंद या सॉफ्टवेअरमध्ये केली जाते. तसेच आरतीला उपस्थित असणाऱ्या पासधारक भाविकांनाही ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे. यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी पुढाकार घेतला आहे.