अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी येथील श्री. साईबाबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांना दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध साईमंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या नियमांत शिथीलता करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने 15 हजार आणि यापुढे बायोमेट्रिक पध्दतीने 10 हजार अशा 25 हजार भाविकांना दर्शनपास देण्यात येणार आहे.
गेल्या एक महिन्यापासून साईबाबांचे शिर्डी येथील मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दररोज पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता.
मात्र साईबाबा संस्थानच्या संकेतस्थळाची कुशलता तसेच दलालांच्या बनावट पासेसमुळे या कालावधीत साईभक्तांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सोमवार दि.15 रोजी काही भाविकांच्या खात्यातून ऑनलाईन पासेससाठी पैसे जमा झाले.
मात्र पासेस मिळाले नाही. यामुळे संतप्त भाविकांनी साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक चार समोर आंदोलन करून संस्थान प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.
अखेर दि.16 नोव्हेंबर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साईसंस्थानला 10 हजार बायोमेट्रिक दर्शनपास देण्यासाठी परवानगी दिली आहे.