अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी श्रींच्या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले.
राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. 07 ऑक्टोबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सध्या कोरोना विषाणुचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेवुन देशात व राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी डबल मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, दर्शनास प्रवेश करताना दर्शनरांगेतील इतर वस्तुंना आणि श्रींच्या समाधीस स्पर्श करु नये.
याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहीत्य नेण्यास सक्त मनाई आहे. दर्शन पास वितरण काऊंटरवर होणार्या गर्दीमुळे आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता साईभक्तांनी ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत श्रींच्या दर्शनाकरीता यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.