सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सोयाबीन बियाणांचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी केला आहे. यंदा २२ किलोची बॅग १८७० रुपयांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा ३३० रुपयांचा फायदा होणार आहे. तर, उडदाच्या पाच किलो बॅगची किंमत १२५ रुपयांनी महाग झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनच्या विविध वाणांना मागणी असते. यामध्ये फुले संगम, जीएस ३३५, ९३०५ आदी वाणांचा समावेश आहे. यातील काही वाणांचे दर ८५ रुपये तर काहींचे ८७ रुपये प्रतिकिलो आहे. मागील हंगामात १०० रुपये प्रति किलोप्रमाणे २२ किलोची बॅग २२०० रुपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत होती.
८७५ रूपयांना बॅग
दुसरीकडे उडदाची पाच किलोची बॅग १२५ रुपयांनी महागली आहे. मागील हंगामात ५ किलोच्या बॅगसाठी ८७५ रुपये द्यावे लागत होते. आता त्याच बॅगची किंमत १२५ रुपयांनी वाढली आहे. शेतकऱ्यांना ५ किलोच्या एका बेंगसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मागील हंगामात प्रतिकिलो १७५ रुपये दर होता तर यावेळी २०० प्रतिकिलो आहे.
कमी दिवसांत काढणी
शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या ९५ ते ९८ दिवसांत काढणीला येणाऱ्या वाणाला पसंती दिली जातेय, सोयाबीननंतर कांदा किवा हरभरा पिकाचे उत्पादन घेता येते. ११० दिवसांचे पुढे पीक गेले तर पाणी देण्याची वेळ येते. त्यामुळे मागील काही दिवसांत शेतकऱ्यांकडून कमी दिवसांतील वाणाला पसंती दिली जाते.
महाबीजकडून वितरित होणारे बियाणे
सोयाबीनः १८ हजार क्विटल
उडीदः १ हजार ४०० क्चिटल
मूगः १४० क्विंटल
तूरः ३५० क्चिटल