अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- राज्य शासनाच्या आदेशाने दि. 7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता श्रींच्या दर्शनाकरिता मर्यादित संख्येने भाविकांना दर्शन देण्यात येत आहे. त्यामुळे साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाकरिता येताना संस्थानच्या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
साईभक्तांनी आपली फसवणूक व होणारी गैरसोय टाळण्याकरिता संस्थानचे online.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेतच श्रींच्या दर्शनाकरीता यावे. इतरत्र खाजगी व्यक्तीकडून दर्शन पासेस घेऊ नये.
तसेच बनावट व जादा रक्कमेत दर्शन पासेस विक्री करणारे दलाल आपले लक्षात आल्यास त्याची माहिती संस्थानला अथवा स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावी, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान सर्व साईभक्तांनी दर्शनाकरिता जाताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर (6 फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे.
मास्कचा वापर न करणार्या साईभक्तांना तसेच 10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व्यक्ती व आजारी व्यक्तींना शासनाचे निर्देशाप्रमाणे मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.