अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- जग विख्यात असलेले अहमदनगर जिल्हयातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यातच साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे.
या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी सव्वा पाच वाजता तर शेजारती रात्री १० वाजता होईल. यामुळे दिवसभरात दर्शनाची वेळ सव्वा तासाने कमी होणार आहे.
१ मार्चपासून (महाशिवरात्री) हे नवीन बदल अंमलात येणार आहेत, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दरम्यान ६ एप्रिल २००८ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काकड आरती पाऊण तास आधी पहाटे साडे चार वाजता, तर शेजारती अर्धा तास उशिराने रात्री साडे दहा वाजता घेण्याचा निर्णय घेतला होता.
यामुळे दिवसभरातील दर्शनाची वेळ सव्वा तासाने वाढली होती. अनेक भाविक रात्री शेजारतीनंतर जेवतात, आरती होईपर्यंत हॉटेल व प्रसादालय बंद झालेले असते.
त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. याशिवाय काकड आरतीला खूपच लवकर तीन-साडे तीन वाजताच मंदिरात जावे लागते. यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर आरत्यांची वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून झाली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.