अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये करोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी शहरामध्ये २५६ सक्रिय रुग्ण बाधित असून रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यासाठी नगर शहरात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’, शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे अशी शिफारस आरोग्य समितीच्यावतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात येणार आहे.
यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संजय ढोणे, सतीश शिंदे, सचिन जाधव, निखिल वारे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, शशिकांत नजान व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.
मनपा आरोग्य समितीच्यावतीने करोना रुग्णवाढ उपाययोजना संदर्भात शनिवारी संयुक्त बैठकीमध्ये समितीच्या सदस्यांनी विविध उपाययोजना सुचवतांना सांगितले की, लसीकरण वाढविण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी.
आणि ज्याठिकाणी लसीकरण कमी आहे, त्याठिकाणी कोविडची रुग्ण संख्या वाढत आहेत. ज्या भागात लसीकरण कमी झाले आहे अश्या भागांना प्रतिबंधात्मक झोन म्हणून घोषित करावा.
दक्षता पथकाने शहरांमध्ये फिरून लसीकरण व मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी, ओमिक्रोनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून १५ जानेवारीपर्यत मोठी रुग्ण संख्या वाढलेली दिसेल.
परंतु ९० टक्के नागरिकांना या आजाराचे लक्षणे दिसणार नाहीत. उर्वरित दहा टक्के नागरिकांपैकी दोन टक्केच नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे. कोरोनाचा संसर्गावर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही.
१७८ करोना रुग्णांमध्ये ५२ रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. यावरून लस न घेतलेल्यांना करोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे.
जे नागरिक आत्तापर्यंत लसीकरणासाठी पुढे आले नाहीत, त्यांना करोनाचा धोका अधिक आहे. मनपा प्रशासनाने दंड आणि बंधनापेक्षा नागरिकांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून करोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे.
यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, शहरात २६१ परदेशावरून नागरिक आले असून त्यांच्या कोरोना तपासण्या झालेली आहे. आता यापुढील काळात परदेशातून येणार्या नागरिकांना सात दिवस विमानतळावर रहावे लागणार आहे.