अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका देशात वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा लसीकरणावर भर देण्यात येऊ लागली आहे. यातच एक महतवाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे.
फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचं इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे.
‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.
संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता.
या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली. यामध्ये असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.